सोलापूर – वृक्षारोपणापासून वृक्षसंवर्धनापर्यंत आणि पर्यावरण जनजागृतीपासून सामाजिक उपक्रमांपर्यंत विविध माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या हरित वसुंधरा फाऊंडेशन, सोलापूरच्या प्रवासाला दहा वर्षे पूर्ण झाली. १५ ऑगस्ट २०१६ रोजी सुरू झालेल्या या संस्थेने दशकपूर्तीच्या निमित्ताने आता नव्या जोमाने पर्यावरण संवर्धनाची चळवळ विस्तारण्याचा संकल्प केला आहे.
दशकपूर्तीचे औचित्य साधून गुळवंची येथील शेतकरी दांपत्य लिंबाजी खताळ व नीलावती खताळ यांच्या हस्ते ५०० रोपांच्या मोफत वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. ‘वृक्ष संवर्धनाची कृती हीच वसुंधरेच्या रक्षणाची नीती’ या विचारातून सुरू झालेल्या संस्थेच्या कार्याला या उपक्रमामुळे अधिक व्यापक स्वरूप मिळणार आहे.
गेल्या दहा वर्षांत फाऊंडेशनच्या माध्यमातून सोलापूर शहर व परिसरात पाच हजारांहून अधिक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. मात्र, केवळ रोपे लावण्यापुरते संस्थेचे काम मर्यादित राहिले नाही. लावलेल्या झाडांचे संगोपन, नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती आणि विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडण्याचे प्रयत्न सातत्याने करण्यात आले.
पर्यावरणाच्या जोडीने संस्थेने सामाजिक बांधिलकीही जपली. आकाश निरीक्षण उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राची आवड निर्माण करणे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण तसेच महापुरुषांच्या विचारांना उजाळा देणारे वैचारिक जयंती उत्सव असे विविध उपक्रम संस्थेने राबविले.या कार्यात शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांचे सातत्यपूर्ण सहकार्य लाभल्याचे संस्थेने नमूद केले.
दहा वर्षांचा टप्पा हा संस्थेच्या कार्याचा शेवट नसून नव्या दशकाची सुरुवात असल्याची भावना फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. आगामी काळात अधिकाधिक नागरिक, विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांना सोबत घेऊन हरित, स्वच्छ आणि सुंदर सोलापूर घडविण्यासाठी व्यापक उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
‘एक झाड लावूया, एक झाड जगवूया’ या चळवळीत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले..या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अमित बनसोडे यांच्यासह रोहन खंदारे, सागर मुरडे, द्वारकेश सावंत, सलमान शेख, तानाजी यादव, महेश पवार आणि सागर संभारंभ यांनी विशेष परिश्रम घेतले.
चौकट
‘ग्रीन सिटी-२०३६’मधून विद्यार्थ्यांना व्यासपीठ
दशकपूर्तीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणाशी संबंधित विविध नाविन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ग्रीन सिटी-२०३६’ या चित्रकला स्पर्धेतून भविष्यातील हिरवेगार सोलापूर विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून साकारले जाणार आहे. त्याचबरोबर ‘देशी वृक्ष-माहिती’ स्पर्धेतून स्थानिक वृक्षांचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळणार आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘पर्यावरण संवर्धन रील स्पर्धा’ देखील घेण्यात येणार आहे.
Post Views: 17