तभा फ्लॅश न्यूज : उजनी व वीर धरणातून अतिरिक्त झालेले पाणी भिमा नदीच्या पात्रात 1 लाख 87 हजार 850 क्युसेक सोडल्याने माचणूर येथे भिमा नदी धोक्याच्या पातळीत वाहत असून उचेठाण,बठाण, माचणूर,अरळी,वडापूर,सिध्दापूर आदी को.प. बंधारे पाण्याखाली गेले असून तिर्थक्षेत्र सिध्देश्वर मंदिरातील श्री जटाशंकर मंदिरही पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. दरम्यान सध्या पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहात जावू नये असे आवाहन भिमा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी श्रीशैल हालकुडे यांनी आवाहन केले आहे.
मागील आठवड्यापासून पुणे परिसर व नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असल्याने या परिसरातील पाणी उजनी धरणात व भिमा नदीत आल्याने भिमा नदीत 1 लाख 87 हजार 850 क्युसेक्सने गुरुवारी वाहत असल्याचे पाटबंधारे विभागाचे माचणूर येथील शाखा अभियंता तेजस चव्हाण यांनी सांगितले. उचेठाण – आंबेचिंचोली या दोन गावांना जोडणारा को.प.बंधारा येथे असून को.प.बंधारा पाण्याखाली जावूनही धोकादायक स्थितीमध्ये नागरिकांची मोटर सायकलवरुन ये जा सुरुच होती.
शासनाचा कुठलाही जबाबदार अधिकारी येथे उपस्थित नसल्यामुळे सदरची वाहतूक सुरु असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. या धोकादायक स्थितीत वाहने ये जा करत असल्याचा व्हिडीओ अनेकांनी सोशल मिडीयावर प्रसारीत करुन वस्तूस्थिती दाखवून दिली. यंदा दोन वेळा भिमा नदी पुर सदृश्य परिस्थितीत वाहिली. मे च्या शेवटच्या आठवड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्यामुळे भिमा नदी धोक्याच्या पातळीत वाहत होती.
Post Views: 22