सोलापूर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेकडून १ ते ९ जुलैदरम्यान विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पुढाकाराने ही मोहीम शहरातील सर्व २६ प्रभागांत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती नियंत्रण अधिकारी शशिकांत भोसले यांनी दिली.
महापौर विनायक कोंड्याल आणि महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली विविध विभागांच्या समन्वयातून व्यापक स्वरूपात ही कारवाई केली जाणार आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरात दररोज रस्त्यांची झाडलोट, कचरा संकलन व वाहतूक, सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता आदी कामे केली जातात. मात्र पावसाळ्यात विविध ठिकाणी कचरा साचून तो कुजल्याने दुर्गंधी पसरण्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेत शहरातील रस्त्यांची सर्वंकष स्वच्छता, दुभाजकांमधील माती काढणे, अनावश्यक गवत व झाडी-झुडपे हटविणे, वृक्षारोपण, विद्युत खांबांवरील जुने फलक व स्टिकर्स काढणे, रस्त्यावरील बांधकामाचा मलबा हटविणे तसेच परिसरातील भंगार साहित्य, बेवारस वाहने आणि मोटारसायकली हटविण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
ही मोहीम केवळ घनकचरा व्यवस्थापन विभागापुरती मर्यादित नसून महानगरपालिकेच्या सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून राबविण्यात येणार आहे. विभागीय अधिकारी, सहाय्यक अभियंते, उद्यान अधीक्षक, सार्वजनिक आरोग्य अभियंते, अतिक्रमण प्रतिबंधक विभाग, संगणक प्रोग्रामर, मुख्य सफाई अधीक्षक, सफाई अधीक्षक, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, पर्यवेक्षक व कर्मचारी यांचा यात सहभाग राहणार आहे.
याशिवाय अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्यासह महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, लोकप्रतिनिधी व नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी शशिकांत भोसले यांनी दिली.
या विशेष स्वच्छता मोहिमेला यशस्वी करण्यासाठी शहरातील नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन
नियंत्रण अधिकारी शशिकांत भोसले यांनी केले आहे.
Post Views: 17