सोलापूर : महापालिकेतील घनकचरा विभागा कडील 15 सेवकांना कोणताही रजेचा अर्ज न देता अथवा पूर्वमंजूरी न घेता कामावर विनापरवाना गैरहजर राहिल्याप्रकरणी सेवेतून काढण्यात आले आहे. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील झाडुवाली, बिगारी, वाहन चालक आणि सफाई कामगारांचा समावेश आहे. याप्रकरणी संबंधितांची सुनावणी घेऊन महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी ही कारवाई केली आहे.
या कर्मचाऱ्याकडे नेमून दिलेल्या प्रभागातील दैनंदिन स्वच्छतेच्या कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांच्या विनापरवाना गैरहजेरीमुळे प्रभागातील दैनंदिन स्वच्छतेच्या कामकाजामध्ये अडथळा निर्माण झाला. जे सेवक दिर्घकाळापासून विनापरवाना गैरहजर आहेत अशा सेवकांची माहिती मागविणेत आलेली होती. सेवकांची यादी तयार करुन यादीतील गैरहजर सेवकांच्या सेवापुस्तकासह दि.९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता महापालिका आयुक्त यांचेकडे हजर सेवकांची सुनावणी घेण्यात आली होती. या सुनावणी दरम्यान आयुक्तांनी माहिती घेऊन यादीमधील काही सेवकांना सेवेतून कमी करणे बाबत, काही सेवकांना प्रत्येकी १० हजार रुपये इतका दंड करुन कामावर घेणे बाबत आदेश दिले. या दंडाची रक्कम माहे सप्टेंबर-२०२५ पेड इन ऑक्टोबर-२०२५ च्या वेतनातून कपात करणेत यावे, त्यांचा गैरहजर कालावधी बिनपगारी ग्राह्य धरणेत यावा त्यांच्या नोंदी सेवापुस्तकात घेण्यात यावे, असे आदेश दिले होते.
विना परवाना गैरहजर राहिल्यामुळे त्या सेवकांकडे सोपविण्यात आलेल्या प्रभागातील दैनंदिन प्रभागातील स्वच्छतेच्या कामात अडथळा निर्माण झाला. संबंधित कर्मचाऱ्याकडून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) १९७९ चे नियम ३ (१) एक व दोन) च्या तरतुदीचा भंग झाला असून त्यास सर्वस्वी कर्मचारी जबाबदार असल्याने या 15 सेवकांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ५६ (२) (ग) च्या तरतुदीनुसार पुढे नोकरी मिळण्यास सर्वसाधारणपणे अपात्र होणार नाही अशा रीतीने महानगरपालिकेच्या सेवेतून काढून टाकण्यात येत आहे, असे महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आदेशात म्हटले आहे.
कारवाई झालेल्या सेवकांचे नांव आणि कंसात पदनाम याप्रमाणे
शाम रामचंद्र सावंत (बिगारी), कन्हैय्या संजय शिंदे (झाडुवाला), सोमनाथ नागनाथ थोरात (बिगारी), बाबा नागय्या मुनगानोल्लू (सफाई कामगार), मल्हारी रेवण सुरवसे (झाडुवाला), अमर मोहन गायकवाड (वाहन चालक), नागेश चंद्रकांत जाधव (झाडुवाला), महेशकुमार याकुब मंडेपोल्लू (सफाई कामगार), लक्ष्मण नरसिंग चिटलापल्ली (सफाई कामगार), कृष्णा पेंटय्या सांगेपागा (सफाई कामगार), राम नागय्या अडाकुल (सफाई कामगार), गोविंद हणमंतू बेरकोल्लू (सफाई कामगार), महेश मच्छिद्र कांबळे (बिगारी), शिलरत्न दिलीप सुरवसे (बिगारी), सुलोचना महादेव बनसोडे (झाडुवाली) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
——















