सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथील श्री महादेव मंदिर कळसारोहण कार्यक्रमानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक, आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी आली आहे.
बुधवार पाच नोव्हेंबर ते सोमवार १० नोव्हेंबरदरम्यान कार्यक्रम होणार असून दररोज मंदिर परिसरात सायंकाळी ६ ते ७ यावेळेत लक्ष दीपोत्सव करण्यात येणार आहे. तसेच पाच ते नऊ नोव्हेंबर या कालावधीत सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत जिंतूर येथील ष.ब्र. अमृतेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी शिवपुराणावर आधारित प्रवचन देणार आहेत. नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता अय्याचार्य व लिंग दीक्षा कार्यक्रम असून सकाळी दहा वाजता नंदी व नवगृह प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
तसेच सोमवार दहा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता श्री जागृत गणेश मंदिरापासून ५०१ सुवासिनींसह जलकुंभ मिरवणूक, श्रीशैल पीठाचे डॉ. चन्नसिध्दाराम पंडिताराध्य शिवचार्य व काशी पीठाचे डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य यांची अड्डपालखी मिरवणूक सोहळा होणार आहे. जगद्गुरूंच्या उपस्थितीत कळसारोहण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी माळकवठ्याचे पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी, जिंतूर येथील अमृतेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासह संतगण उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर धर्मसभा होऊन महाप्रसाद वाटप कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मंदिर समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

















