सोलापूर – प्रहारच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात आंदोलन केले होते. अजित पवार यांच्या बॅनरला टोमॅटो मारून निषेध केला होता. प्रहारच्या आंदोलनानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते जबरदस्त आक्रमक झाले आहेत. बुधवार दि.४ नोव्हेंबर रोजी दुपारी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सलीम सय्यद आणि त्यांचे कार्यकर्ते सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल होत, प्रहारच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनंतर दोन पक्षातील वाद आता चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रहारच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे की, लोकशाही मार्गाने आंदोलन करा, अन्यथा राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष गप्प बसण्यासारखा नाही. प्रहारचे नेते सोलापुरात आले, तर त्यांना सोलापुरात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्यांनी दिला आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी नगरसेवक किसन जाधव यांनी देखील प्रहारला इशारा दिला आहे. प्रहारचे नेते आणि कार्यकर्ते बालिश बुद्धीचे आहेत, अशी संतप्त टीका किसन जाधव यांनी केली आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलन केल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले आहे. प्रहारच्या नेत्यांनी यापुढे जर अजित पवारांविरोधात आंदोलन केलं, तर राष्ट्रवादी गप्प बसणार नाही, प्रहार पक्षाचा जो कुणी नेता सोलापुरात येईल, त्याला राष्ट्रवादी जबरदस्त विरोध करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन पक्षातील वाद चिघळल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून नेमकी कोणती भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
फोटो ओळ – सोलापूर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी प्रहार संघटनेच्या नेत्यांनी वरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर बाहेर पडताना चे टिपलेले छायाचित्र..

















