बार्शी – एमआयटी ज्युनिअर कॉलेजतर्फे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व मनोरंजक शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली. या सहलीत विद्यार्थ्यांनी इतिहास, संस्कृती आणि उद्योग क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेत आपल्या ज्ञानात भर टाकली. सुरुवातीला किल्ले प्रतापगड येथे विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करणारे स्मारक आणि ऐतिहासिक शिल्पाला भेट दिली. येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांची ऐतिहासिक भेटीबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्वराज्य स्थापनेचा इतिहास जवळून जाणून घेता आला. यानंतर विद्यार्थ्यांनी मॅप्रो गार्डन भेट दिली. येथे फळप्रक्रिया उद्योग, उत्पादन प्रक्रिया आणि विपणन याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून माहिती मिळाली. शेवटी लोणावळा येथील वेट अँड जॉय वॉटरपार्कमध्ये विद्यार्थ्यांनी सहलीचा मनसोक्त आनंद घेतला.
या सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इतिहास, संस्कृती आणि उद्योग क्षेत्राचा प्रत्यक्ष परिचय झाला. अशा शैक्षणिक सहलींच्या आयोजनातून विद्यार्थ्यांचे ज्ञान अधिक सखोल होते आणि प्रत्यक्ष अनुभवातून त्यांना शिकायला मिळते, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन चव्हाण यांनी सांगितले. त्यांनी या सहलीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

















