राज्य उत्पादन शुल्क, निरिक्षक अ विभाग सोलापूर यांनी सोलापूर शहरातील घोंगडे वस्ती येथे चालणाऱ्या अवैध बनावट ताडीच्या कारखान्यावर अचानक धाड टाकून गुन्ह्यात एकूण 13 पैकी 11आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध भेसळयुक्त ताडी, रासायनिक पदार्थ, वाहतूक करणारी वाहने व इतर साहित्य असा एकूण 12 लाख 17 हजाराचा मुद्देमाल जप्त केला होता. बनावट ताडी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता चे कलम 328 दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारांना अटक करणे राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर समोर मोठे आव्हान होते .
गुन्ह्यातील फरार आरोपी व मुख्य सूत्रधार अंजय्या पापय्या पल्ली, वय ६२ वर्षे तसेच श्रीधर यादगिरी मुत्तागिरी, वय ३९ दोघेही राहणार सोलापूर यांनी कारवाईवेळी घटनास्थळावरुन राज्य उत्पादन शुल्क विभागाला चकमा देत पळ काढला होता. मागील दीड महिन्यांपासून या दोन्ही आरोपींचा ठावठिकाणा सापडत नव्हता, सातत्याने ठिकाण बदलून ते दोघेही आरोपी पळ काढत होते. अखेर गुप्त बातमीदाराकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे व गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून अधीक्षक नितिन धार्मिक यांनी त्यांच्या विभागातील धाडसी अधिकारी व कर्मचा-यांचे विशेष पथक तयार केले. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही सदर पथकाला तात्काळ तेलंगणा राज्यात तपासकामी जाण्यास परवानगी दिली व गुन्ह्यात सखोल तपास करुन अंतिम आरोपींचा छडा लावण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार या विशेष पथकाने 1 फेब्रुवारी रोजी तेलंगणा राज्यातील सिद्धिपेठ शहरात दाखल होत गुन्ह्यातील फरार आरोपींच्या घरावर पाळत ठेवत यातील प्रथम मुख्य सूत्रधार आरोपी अंजय्या पापय्या पल्ली याला सापळा रचून ताब्यात घेतले. यानंतर दुसरा आरोपी श्रीधर यादगिरी मुत्तागिरी याचाही शोध घेत त्यालाही अटक केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितिन धार्मिक यांनी या कारवाईसाठी नियुक्त केलेल्या धाडसी पथकाने ही मोहीम गुप्तरीत्या राबविली होती.
अटक केलेल्या दोन्ही मुख्यसूत्रधार आरोपींना बुधवारी सोलापूरात आणण्यात आले. त्यांना 2 फेब्रुवारी रोजी सोलापूर येथील दारुबंदी न्यायालयात हजर करण्यात आले असता मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती नम्रता बिरादार यांच्यासमक्ष या प्रकरणाची सुनावणी होऊन गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपासाच्या अनुषंगाने या दोन्ही आरोपींना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
ही धाडसी कामगिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपआयुक्त अनिल चासकर, अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक संभाजी फडतरे, सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक अंकुश अवताडे, सहाय्यक दुय्यम निरिक्षक मुकेश चव्हाण , महिला जवान प्रियंका कुटे व वाहनचालक रशिद शेख यांनी गुप्तरीत्या धाडसाने पार पाडली.