सोलापूर : सोलापूर महापालिकेत विविध विभागात सेवानिवृत्त चार अधिकाऱ्यांना निर्दिष्ट कामकाजासाठी करार पद्धतीने पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. यामध्ये सेवानिवृत्त उपअभियंता सिद्रामप्पा उस्तुरगे, सेवानिवृत्त भूमी व अभिलेख उपअधीक्षक सिद्राम तूपदोळकर, सेवानिवृत्त अतिक्रमण प्रतिबंधक विभाग अधिकारी जगन्नाथ बनसोडे आणि सेवानिवृत्त सहाय्यक लेखा अधिकारी सय्यद मननाण यांचा समावेश आहे या चारही अधिकाऱ्यांनी आज महापालिकेत नियुक्त केलेल्या विभागामध्ये पदभार घेतला आहे.
शासकीय , निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित (विशिष्ट) कामासाठी घेण्यासंदर्भातील महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार सोलापूर महापालिकेकडून ही कार्यवाही करण्यात आली आहे. या संदर्भात संबंधितांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी या चार जणांची निवड करण्यात आली. शासन निर्णयास अनुसरून कामकाजासाठी पॅनल तयार करण्यात आले आहे. पॅनलमधील निवड दिलेल्या या अधिकाऱ्यांनी अटी व शर्तीस अधीन राहून कामकाज करावयाचे आहे. नियुक्ती संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आदेश काढले आहेत. त्यांची आज पासून सहा महिन्याच्या कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त अधिकारी यांची नियुक्ती पुर्ण वेळ काम करण्याच्या अटीवर तसेच प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे/माहिती, कामाबाबत गोपनियता बाळगणेच्या अटीवर राहणार आहे. हे चारही सेवानिवृत्त अधिकारी आज त्या त्या विभागात रुजू झाले आहेत.
सेवानिवृत्त कार्यालय अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांची अतिक्रमण विभागाकडे “अतिक्रमण प्रतिबंध अधिकारी” यापदावर शर्ती व अटीस अधिन राहून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नियत्रंण अधिकारी व महापालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार सोलापूर शहरातील अतिक्रमण निष्कासित करण्याचे कामकाज पहावे लागणार आहे. सेवानिवृत्त भूमी व अभिलेख उपअधीक्षक सिद्राम तूपदोळकर यांची नगररचना विभाग व भूमी व मालमत्ता विभागाकडे नियुक्ती केली आहे.
त्यांनी दोन्ही विभागाकडील कामकाजाव्यतिरिक्त सोलापूर शहराकरीता नव्याने होणारे उड्डाण पुलाच्या अनुषंगाने कामकाज पाहावयाचे आहे.
सेवानिवृत्त उपअभियंता सिद्रामप्पा उस्तुरगे यांची सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडील शहरासाठी होणारे पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने कामकाज पाहण्यासाठी नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांना सार्वजनिक आरोग्य अभियंता आणि आयुक्त यांच्या निर्देशानुसार पाणी पुरवठा बाबत कामकाज पाहावे लागणार आहे. तर सेवानिवृत्त सहाय्यक लेखा अधिकारी सय्यद मननाण यांची मुख्यलेखापाल विभागाकडे नियुक्ती केली आहे. त्यांनी मुख्यलेखापाल विभागाकडे शासनाकडून प्राप्त होणारे सर्व विभागाचे लेखापरिक्षण आक्षेपाच्या अनुषंगाने संबंधित विभागाकडून अहवाल प्राप्त करून ती आक्षेप वगळणेकामी लेखापरिक्षण समितीकडे सादर करणे तसेच लेखापरिक्षणच्या अनुषंगाने सर्व कामकाज पहावयाचे आहे, असे महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

















