सोलापूर : तिरुपती येथील पद्मावतीदेवीला यंदा सोलापुरातील पद्मशाली बांधव सामूहिक देणगीतून ‘पुट्टींटी पट्टूचिरा’ अर्थात माहेरची साडी अर्पण करणार आहेत. यानिमित्ताने पद्मावतीदेवीची शुक्रवार, दिनांक 14 नोव्हेंबर रोजी लोटस मंगल कार्यालयात कुंकूमार्चना तर व्यंकटेश्वर मंदिरात 15 ते 19 नोव्हेंबरपर्यंत साडी दर्शन व देणगीदानाची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती पद्मशाली श्री पद्मावतीदेवी ब्रह्मोत्सवम संस्थेचे संस्थापक जनार्दन कारमपुरी व अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी दिली.
तिरुपतीनजीकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावतीदेवी मंदिरात सालाबादप्रमाणे नोव्हेंबरमध्ये ब्रह्मोत्सव होणार असून या उत्सवात शुक्रवार दि. 21 नोव्हेंबर रोजी सोलापुरातील पद्मशाली समाजाचे अनेक जोडपी देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत. याशिवाय कामगार, सामान्य समाजबांधवांच्या सामूहिक देणगीतून एक स्वतंत्र साडी अर्पण करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर संध्याकाळी चार वाजता अशोक चौक, वालचंद कॉलेज समोरील लोटस मंगल कार्यालय येथे पद्मावतीदेवीची कुंकूमार्चना करण्यात येणार आहे. त्यानंतर शनिवार, दि. 15 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर पर्यंत दाजी पेठेतील व्यंकटेश्वर मंदिरात साडी दर्शन व देणगीदानाची सोय भक्तगणांसाठी करण्यात आली आहे.या ठिकाणी यथाशक्ती देणगी देण्यासाठी हुंडीची सोय करण्यात आली आहे.
यामध्ये भक्तांनी देणगी अर्पण करावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
दरम्यान सोलापुरातील पद्मशाली बांधव पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करण्यासाठी 19 नोव्हेंबरला तिरुपतीला रवाना होणार आहेत.
























