सोलापूर – ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रजागृतीच्या पवित्र स्तोत्राला यंदा १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक प्रसंगी आणि सनातन संस्थेच्या २५ वर्षांच्या कार्यसिद्धीचा सुवर्णसंगम साधत, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त भव्य ‘वन्दे मातरम्’ प्रदर्शनी आणि विशेष सत्रांचे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी दिली आहे.
सनातन संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘वन्दे मातरम्’ने संपूर्ण भारताला राष्ट्रभावनेच्या सूत्रात बांधले. स्वातंत्र्यलढ्यातील प्रेरक स्मृती, त्याग, राष्ट्रासाठीचे समर्पण आणि असंख्य क्रांतिकारकांच्या हृदयातील उर्जा या गीताने जिवंत केल्या. ही प्रेरणा आजच्या युवापिढीपर्यंत पोचवणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.’
या विशेष कार्यक्रमातील आकर्षणे
– १००० जणांचे समूहगायन : ‘वन्दे मातरम्’ राष्ट्रभावनेचे महाअभियान
– इतिहासाचे चलचित्र-प्रक्षेपण : ‘वन्दे मातरम्’चा उगम, संघर्षगाथा व राष्ट्रउभारणीतली भूमिका
– केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत यांचे मार्गदर्शन : ‘वन्दे मातरम्’च्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि राष्ट्रीय महत्त्वावर भाष्य
या प्रदर्शनात मातृभूमीवरील प्रेम, राष्ट्रासाठीचा त्याग व भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा अनुभवात्मक स्वरूपात उभा केला जाणार आहे.
नागरिकांना आवाहन
सनातन संस्थेच्या वतीने सर्व हिंदूंना, समस्त नागरिकांना आणि तरुण पिढीला या अविस्मरणीय प्रदर्शनीला उपस्थित राहून ‘वन्दे मातरम्’चा आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय वारसा जाणून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. येताना प्रत्येकाने शासकीय ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.
स्थळ: भारत मंडपम्, नवी दिल्ली (इंद्रप्रस्थ)
दिनांक: १३ ते १५ डिसेंबर २०२५


















