धाराशिव – मौजे धारूर येथील सिद्धार्थ नगर (दलित वस्ती) मध्ये २०२४–२५ या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती–नवबौद्ध वस्ती विकास योजनेअंतर्गत मंजूर असलेले सिमेंट रस्ता व नाली बांधकाम (सांकेतिक क्र. ३८५) हे काम अनधिकृतरीत्या सवर्ण वस्तीत वळवून सुरू केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
उक्त कामाचे ठेकेदार म्हणून स्वयं ग्रामपंचायतच कार्यरत असल्याने, मंजूर योजनेतील कामाचे ठिकाण विनाअनुमती बदलणे हे नियमबाह्य, निधीचा अपहार करणारे आणि पदाचा दुरुपयोग ठरणारे असल्याचे निदर्शनास आले आहे.
निवेदनातील प्रमुख मुद्दे
आर.पी.आय. (खरात गट) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पुढील बाबी स्पष्ट केल्या आहेत—
सिद्धार्थ नगर (दलित वस्ती) मध्ये पुरेशी जागा उपलब्ध असतानाही मंजूर योजना सवर्ण वस्तीत वळविणे हा जातीव्देषी हेतू व प्रशासकीय नियमांचा उघड भंग आहे.
मंजूर कामाची जागा बदलण्याचा अधिकार नसतानाही ग्रामपंचायतीने स्वतः ठेकेदार म्हणून अनधिकृतरीत्या हस्तक्षेप केला आहे.
या प्रकाराने SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायदा, 1989 तसेच संबंधित शासकीय नियमांचे उल्लंघन झाले आहे.
मागण्या
सवर्ण वस्तीत सुरू असलेले अनधिकृत काम तात्काळ थांबवून रद्द करावे.
मंजूर निधीनुसार सिमेंट रस्ता व नाली बांधकामाचे काम सिद्धार्थ नगर (दलित वस्ती) येथेच त्वरित आरंभ करावे.
ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक, संबंधित अधिकारी व निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेल्या जबाबदारांविरुद्ध लागू कायदेशीर तरतुदीनुसार गुन्हा दाखल करावा.
या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी नियुक्त करून जबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन करावे.
पुरावे सादर व इशारा
घटनास्थळाचे फोटो, नकाशे व संबंधित दस्तऐवज प्रशासनास पुरावा म्हणून सादर करण्यात आले आहेत.
या प्रकरणात तातडीची व प्रभावी कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला असून, त्यातून उद्भवणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी प्रशासनाची राहील, असे स्पष्ट नमूद केले आहे.
निवेदनावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, बापूराव गायकवाड, कांचन गायकवाड, सुरेश रोकडे, आदींच्या सह्या आहेत























