सोलापूर : येथील भारतरत्न इंदिरा गांधी क्रीडा संकुल (पार्क स्टेडियम) संदर्भात नोंदणीकृत करारनामा वेळेत करून घ्या अन्यथा ‘इओआय’ प्रक्रिया रद्द करणार, असा इशारा महापालिका आयुक्त तथा पार्क स्टेडियम कमिटी अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) पत्राद्वारे दिला आहे.
पार्क स्टेडियमच्या देखभालीबाबत चर्चा स्टेडिअम कमिटीची दि.२९ मे २०२५ रोजी बैठक घेण्यात आली होती.या बैठकीमध्ये स्टेडिअमसाठी प्रति वर्ष देखभाल व दुरुस्तीसाठी ७० लाख ५६ हजार ७५६ रुपये व वीज देयकापोटी ११ लाख प्रति वर्ष इतका खर्च होतो. या क्रीडा संकुलावर प्रति वर्ष इतका खर्च करणे आर्थिकदृष्ट्या सोयीचे नसल्याने महापालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमनुसार हे स्टेडियम भाडे करारावर देण्याबाबत इच्छुक संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले होते. याबाबत ‘इओआय’ प्रक्रिया राबवण्यास आयुक्त यांनी दि.३ जून २०२५ रोजी मान्यता दिली होती. हे स्टेडियम करारावर घेण्यास महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने तयारी दर्शवली होती. त्यानुसार जे संकुल दि.९ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांना ३० वर्षाकरिता हस्तांतरित करण्याबाबत प्रशासक ठराव दि.२५ जून रोजी पारित करण्यात आला होता. यासंदर्भात अनामत रक्कम म्हणुन २५ हजार रुपये इतकी भरण्याबाबत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला दि.३ जुलै रोजी महापालिकेने पत्र दिले.
दि.२८ ऑगस्ट रोजी स्टेडिअमचा ताबा देण्याकामी व भाडेपट्टा करार करण्याकामी मुद्रांक शुल्क हे अंदाजे ३.५० कोटी रुपये लागणार असल्याने त्यामध्ये सवलत मिळण्याबाबत असोसिएशनने पत्र दिले होते. यानंतर स्टेडिअम देखभालबाबत प्रथमतः तात्पुरत्या स्वरुपात दि.४ सप्टेंबर रोजी करारनामा करुन स्टेडियमचा ताबा एमसीएला देण्यात आला होता.तसेच मुद्रांक शुल्क माफीबाबत मार्गदर्शन होण्यासाठी प्रधान सचिव, महसुल व वन विभाग यांना दि.९ सप्टेंबर रोजी पत्र देण्यात आले होते.
दरम्यान शासनाचे मुद्रांक शुल्क माफीबाबत मार्गदर्शन प्राप्त न झाल्याने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांना क्रीडा संकुलाबाबत तात्काळ सह जिल्हा निबंधक कार्यालयमार्फत नोंदणीकृत करारनामा करुन घेण्याबाबत व वेळेत नोंदणीकृत करार न केल्यास इओआय प्रक्रिया रद्द करण्यात येईल, असे पत्र देण्यात आले आहे, असे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

















