सोलापूर – प्रभाग क्रमांक २२ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत टकारी समाजासाठी उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक भवनाचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साही व ऐतिहासिक वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रभाग क्र. २२ चे माजी नगरसेवक किसन जाधव आणि सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या अथक व विशेष प्रयत्नातून हा महत्त्वाकांक्षी विकासप्रकल्प साकार झाला आहे.
विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष विकास निधीतून ५० लाख रुपयांचा भरीव निधी या सांस्कृतिक भवनासाठी मंजूर करण्यात आला असून, त्यामुळे टाकारी समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. याप्रसंगी टाकारी समाजाच्या वतीने नगरसेवक किसन जाधव व नगरसेवक नागेश गायकवाड यांचा शाल व फेटा बांधून सन्मान करण्यात आला. समाजाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाजबांधवांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.


























