सोलापूर – महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर शहर भाजपमध्ये मोठ्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असणार्या सर्व इच्छुकांसोबत शहरातील विविध ठिकाणी संवाद साधला.
याप्रसंगी आ. सुभाष देशमुख यांच्यासह मनीष देशमुख, शशी थोरात, डॉ. शिवराज सरतापे, हनुमंत कुलकर्णी, प्रभागातील मंडळ अध्यक्ष व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. सोलापूर महापालिका निवडणुकीत सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात आठ प्रभागाचा समावेश आहे. गतवेळच्या निवडणुकीत आठ प्रभागातील 22 नगरसेवकापैकी 11 नगरसेवक हे भाजपचे होते. यंदाच्यावेळी या सर्व 22 प्रभागातून 200 पेक्षा जास्त इच्छुक आहेत. त्यांच्याशी संवाद आ. देशमुख यांनी साधला.
भाजप हा कार्यकर्त्यांना संधी देणारा पक्ष आहे. महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत. सर्वांना उमेदवारी देणे शक्य नाही. त्यामुळे पक्षाकडून ज्याला उमेदवारी देण्यात येईल, त्या उमेदवारांचा सर्वांनी एकत्रित प्रचार करावा. भविष्यात संधी उपलब्ध होईल, तसा न्याय उर्वरित कार्यकर्त्यांना देण्यात येईल. असे आश्वासन आ. सुभाष देशमुख यांनी दिले.
यावेळी इच्छुकांनी उमेदवारी देताना प्रभागातील स्थानिकांचा विचार व्हावा, आयात उमेदवाराला उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका मांडली.

















