करकंब – दिनांक ५ व ६ जानेवारी रोजी स्वेरी कॉलेज गोपाळपूर येथे ५३वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.या प्रदर्शनात जिल्हा परिषद प्राथमिक शाळाअलंकापुरी,करकंब येथील प्राथमिक शिक्षक विशाल रेपाळ यांनी शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत प्राथमिक शिक्षक गटातून पंढरपूर तालुक्याचे प्रतिनिधित्व केले.त्यांनी तयार केलेल्या ‘माझी गणित शाळा’ या साहित्यास जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाल्याने त्यांची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाकरिता निवड झाली आहे.घोकमपट्टीपेक्षा प्रत्यक्ष पाहण्यातून,कृतीतून घेतलेले ज्ञान हे चिरंतन टिकते.हा विचार समोर ठेवून विद्यार्थ्यांना अध्ययनात येणाऱ्या अडचणी व त्यांची आवड लक्षात घेऊन त्यांना कृतीतून समजण्यास सोपे जाईल अशा विविध संकल्पना या गणित शाळेत आहेत.इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना अवघड वाटणारे गणिताचे सर्व संबोध,संकल्पना,स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या क्लृप्त्या विद्यार्थ्यांना हसत,खेळत मनोरंजक पद्धतीने अधिक सोपे करून शिक्षकांना शिकवता येईल व सर्व विद्यार्थ्यांनाही आनंदाने शिकता येईल असे विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य या एकाचं साहित्यात पाहायला मिळते.त्यामुळे बाहेरून प्रदर्शन पाहायला आलेले आणि सहभागी असलेले सर्व विद्यार्थी व शिक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ही “गणित शाळा” ठरली.एवढेच नव्हे तर परीक्षकांनासुद्धा या शैक्षणिक साहित्याने भुरळ घातली.जादुई पेटार्याप्रमाणे एकात एक असलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पना तितक्याच कल्पकतेने,सृजनशीलतेने, कलात्मकपणे मांडल्यामुळे सर्व संकल्पना उत्साहात,प्रश्न उत्तरांची देवाण-घेवाण करत परीक्षकांनी बारकाईने परीक्षण केले आणि राज्यस्तराकरीता निवड केली.
प्रदर्शनातील या यशाबद्दल सोलापूर जिल्ह्याचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी प्रकाश नांगरे यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन शिक्षक विशाल रेपाळ यांचा सन्मान करण्यात आला.पंढरपूर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी मारुती लिगाडे,जिल्हा विज्ञान मंडळाचे पदाधिकारी पेहे केंद्राचे केंद्रप्रमुख दशरथ मोरे,करकंब केंद्र तसेच तालुक्यातील शिक्षकांनी त्यांचे कौतुक करून अभिनंदन करून राज्यस्तरीय प्रदर्शनाकरिता शुभेच्छा दिल्या.
गतवर्षीही प्राथमिक शिक्षक विशाल रेपाळ यांच्या बहुउद्देशीय विदूषक या साहित्याची राज्यस्तरावर निवड झाली होती.पाचव्यांदा त्यांच्या साहित्याची राज्यस्तरावर निवड झाली आहे.नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात ते सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
















