सांगोला – विद्यामंदिर ज्यु.कॉलेज येथे इ.१२ वी कला, वाणिज्य, शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांची द्वितीय सत्र पालक- शिक्षक सभा उत्साहात पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, प्रा.जालिंदर मिसाळ उपस्थित होते. प्रास्ताविकातून प्रा.धनाजी चव्हाण यांनी सभेचा हेतू स्पष्ट केला.
मनोगतातून प्रा.नवनाथ बंडगर यांनी कला शाखेतील विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरीच्या व रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. वाणिज्य शाखेच्या प्रा.प्रसाद खडतरे यांनी विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे असे सांगितले. शास्त्र शाखेच्या प्रा.मिलिंद देशमुख यांनी लॉगटेबल, डेरिवेशन, फॉर्मुले व डायग्राम यांच्या सरावासोबत शास्त्रीय भाषेत उत्तर लिहिणे गरजेचे आहे असे सांगितले. प्रकाश म्हमाणे यांनी बोर्ड परीक्षेचे स्वरूप, नियम व अटी याबाबतचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
पालक विनोद उबाळे यांनी शाळेतील उपक्रमांचे कौतुक करत शाळेबरोबर पालकांच्याही जबाबदारीची जाणीव करून दिली. या सभेचे सूत्रसंचालन प्रा.आरती वेदपाठक यांनी केले. आभार प्रा.विजयकुमार सासणे यांनी मानले.


















