सोलापूर : निर्भीड पत्रकारिता, अभ्यासपूर्ण लेखन, परखड राजकीय विश्लेषण आणि सामाजिक बांधिलकी जपणारे ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या पत्रकारिता, समाजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. सत्ताधाऱ्यांवर कठोर टीका करण्याचे धाडस, प्रत्येक घटनेकडे दोन्ही बाजूंनी पाहण्याची चिकित्सक वृत्ती आणि मित्रांना जोडून ठेवणारा मनमिळाऊ स्वभाव, अशा विविध पैलूंमधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यांच्या विचारांचा आणि पत्रकारितेचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सोमवारी ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांच्या निधनानिमित्त आयोजित श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत भावपूर्ण आदरांजली वाहिली. यावेळी आसबे यांच्यासोबतच्या जुन्या आठवणी, सामाजिक चळवळीतील सहभाग आणि पत्रकारितेतील निर्भीड भूमिकेचे विविध प्रसंग उपस्थितांनी कथन केले.
प्रा. विलास बेत यांनी सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी प्रताप आसबे यांनी केलेल्या प्रयत्नांची आठवण सांगितली. या मागणीसाठी त्यांनी पुढाकार घेऊन आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. समाजकार्य म्हणजे काय आणि सामाजिक प्रश्नांसाठी कसे लढायचे, याची प्रेरणा त्यांनी दिल्याचे बेत यांनी सांगितले. हेमू चंदेले यांनी आसबे यांच्याशी असलेली मैत्री आणि त्यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाच्या आठवणी सांगितल्या. अॅड. जे. जे. कुलकर्णी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी युवक क्रांती दलाच्या माध्यमातून आसबे यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
ए. बी. राजमाने यांनी आसबे यांच्या साहित्यिक आणि काव्यविषयक जाणिवांचा उल्लेख केला. ते केवळ पत्रकार नव्हते, तर साहित्याची उत्तम जाण असलेले कवी आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी त्यांच्या मनमोकळ्या स्वभावाचे, बुद्धिमत्तेचे आणि वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचे स्मरण केले.
अॅड. शंकर पाटील यांनी आसबे यांच्याशी असलेल्या ५६ वर्षांच्या मैत्रीच्या आठवणी सांगितल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आंदोलनापासून आमची मैत्री सुरू झाली. आसबे यांच्यासारखा अभ्यासू आणि निर्भीड पत्रकार मित्र लाभणे हे भाग्य आहे. पत्रकारिता करताना जीवाला धोका निर्माण झाला, तरी त्यांनी आपली भूमिका सोडली नाही. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता त्यांनी शेवटपर्यंत पत्रकारितेची मूल्ये जपली.यावेळी आसबे यांच्या राजकीय विश्लेषणातील वस्तुनिष्ठतेचाही विशेष उल्लेख करण्यात आला. टीका करतानाही संबंधित व्यक्तीची बाजू समजून घेण्याची वस्तुनिष्ठता त्यांच्या पत्रकारितेत होती, अशी आठवण यावेळी सांगण्यात आली. महाविद्यालयीन जीवनापासूनच्या भेटीगाठी आणि दुष्काळी कामांच्या वार्तांकनातील प्रसंगांचाही यावेळी उल्लेख करण्यात आला.
श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे म्हणाले, पत्रकार संघातर्फे पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य यांच्या नावाने त्यांना पुरस्कार देण्यात आला होता. त्या पुरस्काराची २५ हजार रुपयांची रक्कम त्यांनी पत्रकार संघाला परत देऊन केवळ स्मृतिचिन्ह स्वतःकडे ठेवले होते. यातून त्यांचे सोलापूरवरील प्रेम आणि पत्रकार संघाविषयीची आत्मीयता दिसून येते, असे खेलबुडे यांनी सांगितले.ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले यांनी खैरलांजी प्रकरणाच्या वार्तांकनातून आसबे यांनी निर्भीड पत्रकारितेची ताकद दाखवून दिल्याचे सांगितले. सोलापूरसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी भूषण वाटावे असे त्यांचे पत्रकारितेतील योगदान होते.
या शोकसभेस नागनाथ सोनकवडे, चंद्रकांत पवार, अमृतदत्त चिनी, दिनेश शिंदे, श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस आफताब शेख, अविनाश कुलकर्णी, गिरीश गोरे, किरण बनसोडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन पत्रकार संघाचे खजिनदार विजय गायकवाड यांनी केले.
‘प्रताप आसबे स्मृती पुरस्कार’
सुरू करण्याची सूचना
या वेळी उपस्थित मान्यवरांनी प्रताप आसबे यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांच्या नावाने ‘प्रताप आसबे स्मृती पुरस्कार’ सुरू करण्याची सूचनाही मांडली. आसबे यांचे अकाली निधन चटका लावणारे असून, त्यांच्या निर्भीड पत्रकारितेचा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Post Views: 21