सोलापूर : महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने आज शहरातील दोन ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. आज सकाळच्या सत्रात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बाळीवेस परिसरातील रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारे पाच खोके जागेवरच निष्काषित केले. अक्कलकोट रोडवरही कारवाई केली.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसारर नियंत्रण अधिकारी तपन डंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली.
बाळीवेस येथील भिंती लगत रस्त्याच्या कडेला असलेले पाच खोके जेसीबीच्या साह्याने जागेवरच निष्काशीत करण्यात आली. सायंकाळी अक्कलकोट रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ अतिक्रमणविरोधी दुसरी कारवाई करण्यात आली. या वेळी तीन चारचाकी हात गाड्या तसेच रस्त्यावर ठेवलेले इतर साहित्य जप्त करण्यात आले. अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता वाढत असल्याने महापालिकेने ही कारवाई केल्याचे अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी सांगितले.
शहरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि सार्वजनिक रस्ते मोकळे करण्यासाठी अशा कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून रस्त्यावर अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांनी केले आहे.



















