सोलापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात राज्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांचं संपूर्ण जाहीर भाषण संपेपर्यंत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांवाचा उल्लेख टाळला. हा प्रकार निषेधार्ह तितकाच संतापजनक आहे. याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी ”शाक्य” सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी सामाजिक बहुउद्देशिय संस्था, सोलापूर या संस्थेने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नाशिक येथील भारतीय प्रजाकसत्ताक दिनाच्या कार्यक्रमात, 26 जानेवारी रोजी नाशिक येथे राज्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांच्या संभाषणात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांवाचा उल्लेख अखेरपर्यंत टाळला. हा प्रकार निषेधार्ह तितकाच संतापजनक होता.
त्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या वनरक्षक कर्मचारी माधवी जाधव यांनी त्याच मंचावर जाऊन महाजनांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्याचबरोबर भारतीय संविधानाचा विजय असो, अशा घोषणा दिल्या होत्या.
याप्रसंगी अध्यक्ष अगंद मुके, अशोककुमार दिलपाक, शेखर वाघमारे, गोपीचंद कांबळे, अशोक सोनवणे, अंबादास सोनवणे, व्यंकटेश सोनवणे, शशिकांत बाबरे, शांताराम वाघमारे, श्रीमंत गायकवाड, नागेश गायकवाड, श्रीमंत कोरे यांची उपस्थिती होती.

























