सोलापूर : अक्कलकोट रोड, शांती चौक येथील महापालिकेच्या हिंदू स्मशानभूमीची शुक्रवारी महापौर विनायक कोंड्याल, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार आदींनी पाहणी केली. या स्मशानभूमीच्या दूरवस्थेकडे पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी सोमवारी लक्ष वेधले होते. त्यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत महापौर विनायक कोंड्याल यांनी या स्मशानभूमीतील सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. दुरावस्था दूर करण्याचे महापौर विनायक कोंड्याल यांनी आदेश दिले.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महापौर विनायक कोंड्याल, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार , सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, अधीक्षक अभियंता अनिल चव्हाण तसेच संबंधित विभागीय अधिकारी बक्षी यांच्यासमवेत परिसराची सविस्तर पाहणी करण्यात आली.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे, प्रधान सचिव वासुदेव इप्पलपल्ली, जनरल सेक्रेटरी दयानंद मामड्याल,
पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, सचिव संतोष सोमा, विश्वस्त नरसप्पा इप्पाकायल, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, विश्वनाथ दुर्लेकर, छत्रपती अवशेट्टी,भूलिंगम रापेलली, भोजराज पवार, गणेश बिराजदार, सुरेंद्र शिंदे, विनायक खरात, सुनील पाचंगे तसेच पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
दरम्यान, महापौर, अतिरिक्त आयुक्तांच्या या भेटीबद्दल समाधान व्यक्त करत डॉ. सूर्यप्रकाश कोठे म्हणाले की, या स्मशानभूमीतील रस्ता, कमान, नामफलक, संरक्षक भिंतीची उंची वाढवणे, प्रवेशदार उभारणे, वॉचमनची सोय करणे आधी प्रश्न आम्ही मांडले आहेत. याबद्दल महापौरांनी निधीची तरतूद करून सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. याबद्दल महापौर तसेच अतिरिक्त आयुक्तांचे आम्ही आभार मानतो.
अशा आहेत विविध मागण्या
या स्मशानभूमीत सक्षम व जबाबदार वॉचमनची नियुक्ती, स्वच्छ शौचालयाची व्यवस्था करावी, पूर्वेकडील बाजूस कंपाउंड वॉल उभारावे,विद्यमान भिंतीची उंची वाढवावी, मुख्य प्रवेशद्वारावर सुयोग्य नावाची कमान उभारावी, स्मशानभूमीकडे जाणारा सुसज्ज रस्ता तयार करावा, योग्य कचरा व्यवस्थापन व कचरापेट्यांची व्यवस्था करावी,
परिसरात लाईट पोल्सची संख्या वाढवावी, साचलेला आजोरा तातडीने काढावा आदी विविध मागण्या आहेत.
महापौर कोंड्याल यांनी दिले हे आदेश
याप्रसंगी महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केले की, या स्मशानभूमीतील सर्वच प्रश्न सोडवण्यासाठी बजेटमध्ये तरतूद करू. येथील संरक्षक भिंतीची उंची वाढवणे, वृक्षारोपण आधी समस्या मार्गी लावू. अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी सांगितले की, गत दोन दिवसांपासून या स्मशानभूमीतील आजोरा काढून स्वच्छतेचे काम करण्यात येत आहे. महापालिकेच्या निधीमधून तसेच शासनाचा विविध योजनांमधून या स्मशानभूमीचे प्रश्न मार्गी लावणार आहोत. सीएसआर फंडातून काही कामे करता येतील का याचाही विचार करणार आहोत.
























