अक्कलकोट – तालुक्यातील कोन्हाळी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील इयत्ता अकरावी सायन्स वर्गात शिकणारी विद्यार्थीनी कुमारी दिशा ज्ञानेद्र कामाठी याची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अंतराळ विज्ञानासारख्या क्षेत्रात मिळवलेल्या या संधीमुळे कोन्हाळी आश्रम शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत खासगी विजाभज प्रवर्गाच्या आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत कोन्हाळी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.यामध्ये कुमारी दिशा ज्ञानेद्र कामाठी याचा इस्त्रोच्या अभ्यास दौर्यासाठी निवड झाली आहे.
यावेळी कोन्हाळी आश्रम शाळेच्या वतीने दिशा कामाठी याचा यथोचित सन्मान करुन गौरव करण्यात आला आहे.दिशा कामाठी याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आनंदराव जाधव व संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच प्राचार्य सिद्रामप्पा हडपद ,मुख्याध्यापक गणेश सुरवसे , विजय गायकवाड तसेच सर्व शिक्षक आणि पालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
ग्रामीण भागातील आश्रमशाळेतून जागतिक कीर्तीच्या संस्थेपर्यंत पोहोचणाऱ्या या विद्यार्थिनीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.




















