सोलापूर : महापालिकेच्या स्थापनेपासून पत्रकारांचा प्रतिनिधी म्हणून पहिल्यांदाच मला संधी मिळाली आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी पत्रकारिता करणार असून पत्रकार हे माझे कान आणि डोळे राहतील. त्यांच्याच माध्यमातून मी सोलापूर शहराच्या विकासाचे प्रश्न प्राधान्याने मांडणार आहे, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष तथा नूतन स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी दिली.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने नूतन स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विचारमंचावर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा , राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके , प्रशांत बडवे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी खजिनदार किरण बनसोडे यांनी मनीष केत यांच्या कार्याचा गुणगौरव करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक सरचिटणीस सागर सुरवसे यांनी केले. सूत्रसंचालन विश्वभूषण लिमये यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष आफताब शेख यांनी केले. यावेळी पत्रकार व कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















