बार्शी – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुयश विद्यालय, बार्शी यांच्यावतीने शिवसृष्टी येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास मा.आमदार राजाभाऊ राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि अभिवादन करुन करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध पारंपारिक मर्दानी खेळांचे प्रभावी सादरीकरण करुन उपस्थितांना शिवकालीन शौर्याची अनुभूती करुन दिली. झांज पथकाच्या दमदार तालावर परिसर दणाणून गेला आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी बालमावळ्यांनी शिवगीतांवर सादर केलेले नृत्य विशेष आकर्षण ठरले. त्यांच्या जोशपूर्ण सादरीकरणातून शिवभक्ती, शौर्य आणि स्वाभिमानाची भावना प्रकट झाली. तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेला शिवाजी महाराजांचा पाळणा हा कार्यक्रमाचा अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी भाग ठरला.
श्री. राजाभाऊ राऊत यांनी विद्यार्थ्यांचे आणि विद्यालयाचे विशेष कौतुक करताना सांगितले की, अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची जाण, संस्कार आणि देशभक्तीची भावना दृढ होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिवचरित्राबद्दल अभिमान आणि प्रेरणा निर्माण झाली असून उपस्थित पालक, शिक्षक आणि मान्यवरांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.




















