धाराशिव : मराठी साहित्य विश्वातील प्रख्यात अनुवादिका श्रीमती उमा कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी येथील व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयात संपन्न होणार आहे. महाविद्यालयात मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित ‘मराठी साहित्यकृतींची भाषांतरे’, या विषयावरील राष्ट्रीय परिषदेसाठी उद्घाटन तसेच बीजभाषक म्हणून उमा कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने प्रसिद्ध लेखिका दिपाली दातार त्यांची ‘अनुवाद” या विषयावरील प्रकट मुलाखत घेणार आहेत.
या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन व बीजभाषण सकाळी ठीक दहा वाजता संपन्न होईल आणि त्यानंतर लगेचच ही प्रकट मुलाखत होणार आहे. अनुवाद ही एक अत्यंत महत्त्वाची भाषिक व वांग्मयीन प्रक्रिया असून तिचे यथार्थ स्वरूप या निमित्ताने उलगडले जाईल. उमाताई कुलकर्णी यांनी एस एल भैरप्पा, अनंत मूर्ती, गिरीश कर्नाड इत्यादी प्रख्यात लेखकांच्या साहित्यकृती मराठीमध्ये अनुवादित केलेल्या आहेत. त्यांचे ‘संवादु अनुवादू’ हे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे.
या उपक्रमाच्या निमित्ताने साहित्य व्यवहाराशी निगडित भाषांतर या महत्त्वपूर्ण प्रक्रियेसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याची संधी साहित्य रसिकांना उपलब्ध होणार आहे. तरी धाराशिव शहर व परिसरातील साहित्य रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. प्रशांत चौधरी प्रा.डॉ. सहदेव रसाळ, प्रा.डॉ. कृष्णा तेरकर प्रा प्रमोद पाटील, प्रा. डॉ.मारुती गोरे आदींनी केले आहे.

























