सोलापूर – तालुक्यातील औज मंद्रूप येथील रहिवाशी तथा शिर्डी नगरपरिषदेत संगणक अभियंता म्हणून कार्यरत असलेले भालचंद्र सदानंद उंबरजे यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या गावचे नाव उज्ज्वल केले आहे.
चंदिगढ येथे आयोजित खेळलो मास्टर गेम्स राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये त्यांनी ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक , तर १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.त्यांच्या या यशामुळे परिसरातून यांच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे. विशेष म्हणजे , या यशाच्या जोरावर त्यांची वर्ल्ड मास्टर गेम्स २०२७ , कन्साई (जपान) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पहिल्याच प्रयत्नात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते २०१४ ते २०१९ या कालावधीत अक्कलकोट नगरपरिषदेत, २०१९ ते २०२४ कोपरगाव नगरपरिषद येथे कार्यरत होते आणि सध्या शिर्डी नगरपरिषदेत संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहेत.लहानपणापासून त्यांना खेळाची आवड असून शालेय जीवनात खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल तर महाविद्यालयीन स्तरावर धावण्याच्या स्पर्धेत त्यानी विभागीय स्तरापर्यंत सहभाग नोंदवला आहे.


























