वैराग – बार्शी तालुक्यातील झाडी येथे सामाजिक कार्यकर्ते कै. प्रशांत मते यांच्या ८ व्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘मावळा ग्रुप’च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल ११७ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून आपल्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाला आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली.
श्री भगवंत ब्लड बँक, बार्शी यांच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले. यावेळी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बार्शी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष रोहित पाटील, गटनेते विजय चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष मदन दराडे, पंचायत समिती सदस्य संजय भड, रणजीत महानवर,प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी कै. प्रशांत मते यांच्या स्मृतींना उजाळा दिला आणि ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ असल्याचे सांगत तरुणांच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. शिबिरात गावातील व परिसरातील ११७ तरुणांनी उत्साहाने सहभाग घेऊन रक्त संकलनास मदत केली. श्री भगवंत ब्लड बँकेच्या वतीने सर्व रक्तदात्यांना ‘गौरव पत्र’ देऊन सन्मानित करण्यात आले.
या यशस्वी उपक्रमासाठी ‘मावळा ग्रुप’चे सर्व सदस्य, झाडी ग्रामस्थ आणि श्री भगवंत ब्लड बँकेचे टीमने विशेष परिश्रम घेतले. शिबिराच्या माध्यमातून जमा झालेले रक्त गरजू रुग्णांसाठी मोलाचे ठरणार असून, झाडी येथील या उपक्रमाची संपूर्ण तालुक्यात चर्चा होत आहे.
















