सोलापूर – सध्या जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हिंदु समाजामध्ये शौर्य, धैर्य आणि एकजूट जागृत करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती च्या वतीने हनुमान जयंती निमित्त सोलापूर शहरात विविध ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. लातूर आणि धाराशिव शहरांतही विविध ठिकाणी गदा पूजनाचे आयोजन करण्यात आले होते.
इतिहास साक्ष देतो की, ज्या युद्धांमध्ये श्री हनुमान यांची उपस्थिती होती, त्या प्रत्येक वेळी धर्माचा विजय झाला आहे. प्रभू राम यांच्या सैन्यात राहून रावणाचा पराभव करणारे मारुतीराय असोत, महाभारतात अर्जुनाच्या रथावर ध्वजावर विराजमान राहून पांडवांना बळ देणारे असोत, किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी समर्थ रामदास स्वामी यांनी प्रेरित केलेली बलोपासना असो प्रत्येक ठिकाणी हनुमानाचे सामर्थ्य निर्णायक ठरले आहे.
याच प्रेरणेतून सोलापूर शहरात ५५ हून अधिक ठिकाणी गदापूजनाचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये १२०० हून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, युवकांसोबतच महिला आणि लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला.
कार्यक्रमामध्ये गदापूजन विधी, हनुमान आरती, मारुती स्तोत्रपठण, शंखनाद आणि सामूहिक ‘श्री हनुमते नमः’ नामजप करण्यात आला. यानंतर “रामराज्य स्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण आत्मसात करण्याची” प्रेरणादायी मार्गदर्शन सत्रही घेण्यात आले.
हिंदु जनजागृतीच्या वतीने देशभरात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आदी राज्यांमध्ये मिळून ८५० हून अधिक ठिकाणी सामूहिक गदापूजन पार पडले.















