बार्शी – शहरात श्री हनुमान जयंती मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. “अंजनीच्या सुता” म्हणत आणि “बोल बजरंग बली की जय”च्या जयघोषाने संपूर्ण बार्शी नगरी दुमदुमून गेली होती. पहाटेपासूनच शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते.
आज गुरुवार, दि. २ एप्रिल रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास शहरातील विविध हनुमान मंदिरांमध्ये अभिषेक, पूजन करून श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर हनुमान चालीसा व भजनांच्या मधुर स्वरांनी संपूर्ण शहरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.
बार्शी शहरातील पंचमुखी मारुती, बोंबल्या मारुती, ऐनापुर मारुती, सोन्या मारुती, वडार समाज मारुती, श्री हनुमान मंदिर (जुनी वेस), श्री हनुमान व नवग्रह मूर्ती मंदिर (आडवा रस्ता), महाद्वार चौक, माळे गल्ली, भवानी पेठ, वडार गल्ली मारुती, श्री हनुमान मंदिर (अलीपूर रोड), दंगल्या मारुती, जय शंकर मिल, मंगळवार पेठ, घोडके प्लॉट, ४२२ परिसर तसेच कसबा पेठेतील समर्थ व्यायामशाळेत (तरुण भारत कार्यालय) आदी ठिकाणी मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सर्व मंदिरांना आकर्षक रंगरंगोटी व विद्युत रोषणाई, फुलांची सजावट करण्यात आली होती.
जन्मोत्सवात पावसाची हजेरी
दरम्यान, गुरुवारी पहाटेच बार्शी शहरात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर काही काळ ढगाळ वातावरण व काही काळ ऊन असे वातावरण तयार झाले होते. दुपारी चार वाजल्यानंतर पुन्हा एकदा वाऱ्यासह पावसाने बराच वेळ हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.
महाप्रसादाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन
हनुमान जयंतीनिमित्त शहरातील अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. ऐनापुर मारुती, संतोष गुंड मित्र मंडळ (अलीपूर रोड), दोस्ती ग्रुप (खुरपे बोळ), इंडस्ट्री एरिया येथे मधुशेठ चांडक परिवार, विजय तरुण गणेश मंडळ (जुनी वेस) आदी ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक उपक्रमांची जोड
दोस्ती ग्रुप (खुरपे बोळ) यांच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
या उत्सवानिमित्त आमदार दिलीप सोपल व माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी शहरातील विविध हनुमान मंदिरांना तसेच महाप्रसादाच्या ठिकाणी भेटी देऊन पूजाअर्चा केली व भाविकांशी संवाद साधला.

























