सोलापूर – शहरातील अग्रगण्य सहकारी बँक म्हणून ओळख असलेल्या नीलकंठ को-ऑप बँक लि., सोलापूर ने आर्थिक वर्ष 2025-26 अखेरीस उत्कृष्ट आर्थिक कामगिरीची नोंद केली आहे. बँकेने सुदृढ व्यवस्थापन, पारदर्शक धोरणे आणि ग्राहक-केंद्रित सेवांच्या बळावर सर्वच आर्थिक निर्देशांकांमध्ये भरीव प्रगती साधली आहे.
बँकेचे भाग भांडवल 5.36 कोटी रुपये इतके असून एकूण ठेवी 211.59 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत व त्यामध्ये गत सालापेक्षा 21 कोटीनी ठेवीमध्ये वाढ झाली आहे. तसेच कर्जवाटपातही बँकेने प्रभावी वाढ नोंदवत 126.85 लाख रुपयांचा टप्पा गाठला आहे. आर्थिक वर्षात बँकेने 4.96 कोटी रुपयांचा नफा मिळवला असून गुंतवणूक 87.13 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, बँकेने सलग तिसऱ्या वर्षी 0% निव्वळ एनपीए (NPA) राखत आर्थिक शिस्त आणि कर्ज वसुली व्यवस्थापनामध्ये उत्कृष्टता सिद्ध केली आहे.
बँकेचे अध्यक्ष सीए. धनराज ह. नोगजा, उपाध्यक्ष सौ. पद्मा वि. भुतडा तसेच व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष श्री. कौस्तुभ वि. करवा यांच्या मार्गदर्शनाखाली बँक सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद श्री. बलदवा आणि सरव्यवस्थापक सीए. शुभम ना. सोमाणी यांच्या नेतृत्वाखाली बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून UPI सेवा, डेबिट-कम-एटीएम कार्ड्स आणि NEFT/RTGS/IMPS मोबाईल अॅप सुविधा सुरू केल्या आहेत.



















