बार्शी – महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा-एफ) या संघटनेची वार्षिक आढावा बैठक सोलापूर येथे उत्साहात पार पडली. या बैठकीस जिल्ह्यातील सुमारे १४८ संस्थाचालक उपस्थित होते. कोअर कमिटीच्या उपस्थितीत नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
बैठकीस प्रदेशाध्यक्ष हरीष शिंदे व राज्य सचिव गणेश नील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.
यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संभाजी घाडगे यांची निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्षपदी सचिन पवार, जिल्हा सचिवपदी शरद अनंतकवळस, जिल्हा संघटकपदी गणपत मोरे तर जिल्हा खजिनदारपदी अमोल दुर्वे यांची निवड जाहीर करण्यात आली.
बैठकीत शाळांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांसमोरील समस्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरच निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.
नवीन जिल्हाध्यक्ष संभाजी घाडगे यांनी, संस्थाचालक व शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी संघटना कटिबद्ध राहील. शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.
नवीन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले असून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.




















