सोलापूर – जिल्हा परिषदेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता सप्ताह सध्या उत्साहात राबविण्यात येत आहे. ८ एप्रिलपासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत शनिवारी सोलापूर जिल्हापरिषदेच्या शिवरत्न सभागृहात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तदनंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला. तसेच महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे वाटपही करण्यात आले.
जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. समता सप्ताहाच्या माध्यमातून समाजात समतेची जाणीव दृढ करण्याचा प्रयत्न होत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. याकार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे यांनी केले. यावेळी विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, समाजकल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























