सोलापूर – शहर जिल्ह्यातील खाजगी अनुदानित तसेच सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांची पट पडताळणी मोहीम सुरू असून, मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी शिक्षण सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने (दि.१५) जिल्ह्यातील शाळांची प्रत्यक्ष पटपडताळणी करण्यात आली. यातपासणीत एकूण ५२४ शाळांमधील ७४,६८७ विद्यार्थ्यांपैकी ७१,२४१ विद्यार्थी उपस्थित असल्याचे आढळले, तर ३,४४६ विद्यार्थी अनुपस्थित होते. जिल्ह्याची एकूण उपस्थिती टक्केवारी ९५.३९% इतकी नोंदविण्यात आली.
तालुकानिहाय आकडेवारीनुसार, मंगळवेढा (९९.१५%) आणि पंढरपूर (९९.०४%) तालुक्यांमध्ये सर्वाधिक उपस्थिती दिसून आली. त्याखालोखाल सांगोला (९८.६३%) व बार्शी (९८.२३%) तालुक्यांचा क्रमांक लागतो. दुसरीकडे, अक्कलकोट (९४.९६%) व मनपा सोलापूर (९०.०३%) येथे उपस्थितीचा टक्का तुलनेने कमी असल्याचे दिसून आले.
माढा तालुक्यात सर्वाधिक ११९ शाळांची तपासणी करण्यात आली असून, तेथे ९६.९६% उपस्थिती नोंदली गेली. माळशिरस, मोहोळ, करमाळा व उत्तर सोलापूर या तालुक्यांमध्येही ९६% पेक्षा जास्त उपस्थिती दिसून आली, ज्यामुळे जिल्ह्यातील एकूण शैक्षणिक स्थिती समाधानकारक असल्याचे चित्र समोर आले आहे.
या पटपडताळणीमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची अचूक स्थिती स्पष्ट झाली असून, ज्या ठिकाणी उपस्थिती कमी आहे, त्या भागांवर शिक्षण विभागाकडून विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


























