जालना – येथील रहिवासी सौ. जयश्री संजय कटके यांनी आपल्या मालकी हक्काच्या जमिनीच्या न्यायासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. संबंधित जमिनीचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असतानाही काही गुंड प्रवृत्तीचे लोक दहशत निर्माण करत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना सौ. कटके यांनी सांगितले की, त्यांनी रीतसर खरेदीखत केलेल्या जमिनीवर काही लोकांनी जाणीवपूर्वक वाद निर्माण केला आहे. या वादातून गुंड प्रवृत्तीचे लोक वारंवार जागेवर येऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आणि तहसील कार्यालयाकडे वारंवार निवेदने देऊनही अद्याप प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. संबंधित लोकं आपल्याला कोणत्याही क्षणी जाळून टाकू अशी धमकी देत आहेत. आमच्यावर हल्ला होण्याची भीती 24 तास मनात आहे, असा गंभीर आरोप करत सौ. कटके यांनी पोलीस प्रशासनाकडे संरक्षणाची मागणी केली आहे. या त्रासामुळे आपण पूर्णपणे हतबल झाल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे प्रशासनाने या प्रकरणावर गांभीर्याने लक्ष द्यावे, आपण प्रचंड दहशतीमध्ये असून सततच्या धमक्यांमुळे हतबल झाले असून जोपर्यंत न्यायालयाचा अंतिम निकाल लागत नाही, तोपर्यंत शासनाने सदर जागा आपल्या ताब्यात घेतली तरी हरकत नाही, गुंड प्रवृत्तीच्या सुनील राठी, अनिल मालपाणी यांच्या सह अन्य लोकांपासून जीविताला धोका असल्याने तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे,अशी मागणी उपोषणकर्त्या सौ. जयश्री संजय कटके यांनी केली आहे
प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही सुरू असलेल्या या दहशतीमुळे जालन्यात चर्चेला उधाण आले असून, आता प्रशासन या उपोषणाची दखल घेऊन काय पाऊले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सदरील जागा न्यायप्रविष्ठ असल्यामुळे या जागेचा ताबा सरकारने घ्यावा त्या जागेवर कुणालाही ताबा करू देऊ नये अशी मागणी देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

























