बार्शी – जगातील आदर्श भारतीय राजघटना निर्माण करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आधुनिक भारताची उभारणी केली, असे प्रतिपादन प्रा. महेंद्र चंदनशिवे यांनी केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अब्दुल शेख होते.
याप्रसंगी उपप्राचार्य रविंद्र वायकर, कला समन्वयक डॉ. बिरा पारसे, प्रबंधक प्रमोद जाधव, उत्सव समिती चेअरमन डॉ. शशिकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे प्रा. चंदनशिवे म्हणाले की, शिक्षणाने आपला उद्धार होतो, त्याचबरोबर सामाजिक समस्येवर शिक्षणातून उपाय शोधता येतो. महिला कर्मचाऱ्यांना प्रसुती काळात पगारी रजा मिळवून देण्याचे कार्य डॉ. आंबेडकरांनी केले, असे ही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. अब्दुल शेख म्हणाले, महापुरुषांनी समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी अथक प्रयत्न केले. आपण समृद्धतेचा हा वारसा अधिकाधिक व्यापक करावा. महामानवांचे विचार विद्यार्थ्यांना सांगण्याची सध्या नितांत गरज आहे, असेही मत त्यांनी यावेळी मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शशिकांत शिंदे यांनी, सूत्रसंचालन डॉ. राहुल पालके यांनी, तर आभार प्रा. समाधान लोंढे यांनी मानले.


















