पंढरपूर – शहरातील राष्ट्रमाता जिजामाता उद्यानाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले आहे. राष्ट्रमाता जिजामाता उद्यान लोकार्पण सोहळ्यानंतर राजकीय आरोप प्रत्यापरोप सुरू झाले आहेत. सत्ताधारी गटाने विश्वासात न घेता उद्घाटन केल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने विक्रम शिरसट यांनी राष्ट्रमाता जिजामाता उद्यान येथे लोकार्पण सोहळा होऊन देखील हे उद्यान अद्यापर्यंत सर्वसामान्य नागरिकांकरिता खुले न केल्यामुळे त्यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत बाल गोपाळांना सोबत घेऊन आंदोलन केले आहे.
भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राष्ट्रमाता जिजामाता उद्यान लोकार्पण सोहळा व उद्घाटन प्रसंगी जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक तसेच विद्यमान आमदार समाधान अवताडे यांनी पंढरपूर शहराच्या विकासा करिता कोठेही निधी कमी पडू देणार नाही असे ठोस आश्वासन दिले आहे. जिजामाता उद्यानातील उरलेली सर्व कामे पूर्ण करू. कामाच्या बाबतीत विरोधकांनी कधीही सांगावे आम्ही सर्व कामे पूर्णत्वास नेण्याकरिता सदैव तत्पर आहोत. शहरातील विविध कामाकरिता विकास निधी आम्हालाच आणायचा आहे. याची आम्हाला जाणीव आहे असे आश्वासन देखील माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिलेले आहे. तर आमदार समाधान अवताडे यांनी यापूर्वीच सांगितले आहे की, पायात पाय घालून राजकारण करण्यापेक्षा हातात हात घालून विकास कामे करूया. अशी विनंती देखील आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे. मात्र सत्ताधारी व प्रशासन हे कुरघोडीचे राजकारण करत आहे. राष्ट्रमाता जिजामाता उद्यानाचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झालेला असताना देखील जाणीवपूर्वक प्रशासनाने उद्यानाला टाळे ठोकून ठेवले आहे. ही खूपच निषेधार्य बाब आहे.
यावेळी बोलताना विक्रम शिरसट म्हणाले की, पंढरपूर शहरातील राष्ट्रमाता जिजामाता उद्यान लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला असताना देखील प्रशासनाच्या वतीने अद्याप हे उद्यान सर्वसामान्य नागरिकांकरिता खुले करण्यात आलेले नाही. या गोष्टीचा मी निषेध व्यक्त करतो.
दरम्यान माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. पंढरपूर शहरातील शाळेतील लहान मुले, वयोवृद्ध नागरिक, महिला यांचा आनंद हिरावून घेण्याचे काम प्रशासन करत आहे असे देखील विक्रम शिरसट म्हणाले. खरं म्हणजे बालकांकरिता महिलांकरिता, वयोवृद्ध नागरिकांकरिता हे उद्यान खुले करणे गरजेचे असताना देखील काल प्रशासनाने लोकार्पण सोहळा होऊन देखील हे उद्यान बंद ठेवले होते. खरोखर ही घडलेली बाब निषेधार्य असल्याचे सांगत माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी नगरपालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे
दरम्यान माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी बालगोपाळांना सोबत घेऊन एक अनोखे आंदोलन या ठिकाणी केले आहे. आमची लढाई ही प्रशासनाच्या ढिसाळ कारभारा विरोधात आहे. प्रशासन जाणीवपूर्वक अडकाठीची भूमिका घेत आहे. राष्ट्रमाता जिजामाता उद्यानाचे मोठ्या थाटामाटात लोकार्पण सोहळा होऊन देखील प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांकरिता हे उद्यान अद्यापही खुले केले नाही. प्रशासनाची ही आडमुठी भूमिका निषेधार्य आहे. असे मत देखील यावेळी विक्रम शिरसट यांनी व्यक्त केले आहे.
तसेच जिजामाता उद्यान भविष्यात लवकरात लवकर सुरू न केल्यास जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन संबंधित नगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करणार असल्याचे माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.





















