सोलापूर : ‘निसर्ग वाचवा, पृथ्वी वाचवा’ हा केवळ संदेश न राहता ती प्रत्येकाची कृती बनावी, या उद्देशाने जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून सोलापुरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. इको फ्रेंडली क्लब, सामाजिक वनीकरण विभाग आणि सोलापूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील स्मृती वन उद्यान परिसरात ही स्वच्छता मोहीम पार पडली. यावेळी पर्यावरण प्रेमींनी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्यांचा कचरा संकलित करून परिसर चकाचक केला.
सोलापूरचे फुफ्फुस मानल्या जाणाऱ्या स्मृती वन उद्यान परिसरात बेशिस्त नागरिक आणि मद्यपींमुळे मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. बुधवारी सकाळी राबवलेल्या या मोहिमेत युज अँड थ्रो प्लास्टिकचे ग्लास, प्लेट्स, दारू आणि बिअरच्या काचेच्या बाटल्यांसह इतर घातक कचरा मोठ्या प्रमाणात गोळा करण्यात आला.
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी स्वतः सहभागी होऊन उपक्रमाचे कौतुक केले. सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी लक्ष्मण आवारे यांनी अशा मोहिमांमुळे स्मृती वन उद्यानाचा निसर्ग वारसा टिकून राहील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले.
या मोहिमेत सहायक वनसंरक्षक शुभांगी चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी रघुनाथ कांबळे, गुरुदत्त दाभाडे, धर्मेंद्र राऊत, संदीप शेंडे, सचिन जोशी, शंकर कुताटे, महेश हिरेमठ आणि महापालिकेचे आरोग्य निरीक्षक कार्तिक पवार यांनी मोलाचे सहकार्य केले.
या स्वच्छता मोहिमेत इको फ्रेंडली क्लबच्या सदस्या डॉ. मधुरा बुरटे, मेघा क्षीरसागर, शोभा पुराणिक, गंगुबाई कोकणे, स्नेहा क्षीरसागर, अस्मय क्षीरसागर, सुनिता पाटील, राजश्री गायकवाड, धनंजय कांबळे, सचिन कांबळे, सनी पाटील, राकेश दिक्कीत, श्री व सौ चिलजवार, अजित चौहान, संतोष धाकपाडे, सटवाजी कोकणे, सुनील मोतेकर, शिल्पा घोडके, सरस्वती कोकणे, आराध्या कोकणे, सुरज रघोजी, महेश पांढरे, मनोज देवकर, आदी उपस्थित होते.
























