सोलापूर : महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने आज पुन्हा जुळे सोलापुरातील डी मार्ट परिसरात कारवाई केली. दुकानांसमोरील नामफलक व कट्टे निष्काशीत करण्यात आले. न्यू बुधवार पेठ येथील भारतरत्न डॉ. आंबेडकर उद्यानच्या बाजूच्या फुटपाथवरील खोके, पत्रा शेड जागेवरच निष्काशीत करण्यात आले.
सोलापूर शहरात रस्त्यावर अडथळा ठरणारे आणि महापालिकेच्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. आज दुसऱ्या दिवशी पुन्हा जुळे सोलापूर येथील डी मार्ट परिसरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात आली.
त्यानंतर अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या पथकाने
न्यू बुधवार पेठ येथील डॉ. आंबेडकर उद्यान लगत असलेल्या फुटपाथ वरील अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्यात आले. या मोहिमेत दोन खोके, पत्रा शेड जागेवरच निष्कासित करण्यात आले, अशी माहिती महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिली. कारवाई वेळी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात आली.
विक्रेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर आपला व्यवसाय करू नये. रस्त्याला अडथळा आल्याचे दिसून आल्यास तातडीने कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्याला अडथळा निर्माण होईल आणि सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण केल्यास जप्ती आणि इतर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिला आहे.
—-
























