सोलापूर : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने ग्रामीण पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील मंदिर व मशिदींवरील नियमबाह्य भोंगे काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. अनधिकृत भोंग्यांविरोधात मोठी कारवाई करत जिल्ह्यातील एकूण ९३८ भोंगे काढण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.
यामध्ये मंदिरांवरील ५८१ तर मशिदींवरील ३५७ भोंगे असे एकूण ९३८ भोंगे पोलिस प्रशासनाने काढले आहेत.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील विविध ठिकाणी तपासणी करून नियमबाह्य लावण्यात आलेले भोंगे हटविण्यात आले. ही कारवाई अत्यंत शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. विशेष म्हणजे, या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दोन्ही समाजातील नागरिकांनी कायद्याचा आदर राखत पोलिस प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले. तसेच संबंधित धर्मस्थळांचे पदाधिकारी व विश्वस्त यांनीही कायद्याचे पालन करत सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे मोहीम सुरळीतपणे यशस्वी ठरली. या कारवाईमुळे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात ध्वनीप्रदूषण नियंत्रणास मदत होऊन सामाजिक सलोखा व शांतता अबाधित राहण्यास मोठा हातभार लागला असल्याचे पोलिस अधिक्षक यांनी स्पष्ट केले.


























