सोलापूर – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांचे पट्टशिष्य परमपूजनीय श्री इनामदार गुरुजी यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त सम्राट चौक येथील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंदिरामध्ये फुलांच्या माळांनी सजावट करण्यात आलेले आहे.
या अनुषंगाने वैशाख शुद्ध दशमी, रविवार दि. 26 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12.00 वाजता मंदिरात गुलालाचा विशेष कार्यक्रम संपन्न होणार आहे.
रविवारी सकाळी धार्मिक विधी, गुरुगीता पारायण तसेच सकाळी 11 ते 12 या वेळेत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून दिवसभर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण राहणार आहे.
दुपारी 12 वाजता होणाऱ्या गुलाल कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये वांग्याची भाजी व खिरीचा समावेश असून सुमारे सव्वा क्विंटल वांग्याची भाजी तसेच एक क्विंटल खीर तयार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आले असून, सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन मंदिर ट्रस्टचे मुख्य ट्रस्टी श्री मोहन बोड्डू यांनी केले आहे.





















