करमाळा – स्वतःला बाळूमामाचा अवतार असल्याचा दावा करणारा स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ “मनोहर मामा” याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुण्यातील मांजरी परिसरातून ताब्यात घेतले आहे. फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार तसेच महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांमुळे ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी छापेमारी करत मनोहर मामाला अटक केली. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. मनोहर मामा याच्यावर भक्तांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळणे, चमत्कारांच्या नावाखाली फसवणूक करणे आणि महिलांचे शोषण केल्याचे आरोप आहेत. “खिशातील नोटांचे अचूक नंबर सांगणारा बाबा” अशी त्याची ओळख तयार झाली होती.
या दाव्यामुळे मोठ्या संख्येने लोक त्याच्या दरबारात उपस्थित राहत होते. धक्कादायक बाब म्हणजे विविध राजकीय पक्षांतील काही नेते आणि सनदी अधिकारी देखील त्याच्या दरबारात हजेरी लावत असल्याची माहिती समोर आली आहे. काही प्रकरणांमध्ये मोठ्या पदांसाठी किंवा राजकीय फायद्यासाठी त्याचा सल्ला घेतला जात असल्याचेही सांगितले जात आहे.
याशिवाय, समृद्धी महामार्गाच्या बांधकामातून कोट्यवधींची कमाई केलेल्या एका सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्याने नांदेड लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी हेलिकॉप्टरने या बाबाच्या दरबारात हजेरी लावल्याचीही माहिती समोर आली आहे.
या कारवाईनंतर अशा स्वयंघोषित बाबांवर नियंत्रण ठेवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. आता या प्रकरणात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

























