वसमत – जनगणना 2027 या राष्ट्रीय महत्त्वाच्या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी वसमत नगरपरिषदेने कडक पवित्रा घेत अनेक शिक्षक व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या सर्व संबंधितांना तीन दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नगरपरिषद प्रशासनाने दि. 23 ते 25 एप्रिल 2026 दरम्यान जनगणना प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. मात्र, नियुक्त असूनही काही प्रगणक व पर्यवेक्षक प्रशिक्षणास अनुपस्थित राहिल्याचे आढळून आले. त्यामुळे जनगणना अधिनियम 1948 व जनगणना नियम 1990 अंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये चापके हरिभाऊ रामराव योगानंद सरस्वती प्रायमरी स्कूल,
चव्हाण गजानन विश्वनाथ (महात्मा गांधी विद्यालय), ज्ञानबा बळीराम वाकडे (कालवा निरीक्षक, पूर्णा पाटबंधारे विभाग), हंबर्डे सुरेश तुळशीराम, कांबळे गौतम विठ्ठल, लवेकर गजानन श्रीरामराव, मोहम्मद शब्बीर मोहम्मद बशीर, एम. डी. मुजाहेद एम. डी. उस्मान, म. अतिख म. युसूफ, नारायण उद्धव गरगे, पडोळे चंद्रशेखर विलासराव, पोटजे गोविंद विठ्ठलराव, रुस्तुम बाबाराव काळे (योगानंद सरस्वती शाळा), शिंदे संजय नारायण तसेच साळवे प्रकाश साहेबराव (सर्व सहाय्यक शिक्षक) यांचा समावेश आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, जनगणना हे अत्यंत महत्त्वाचे व बंधनकारक राष्ट्रीय कार्य असून, प्रशिक्षणास गैरहजेरीमुळे कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधितांवर जनगणना अधिनियम 1948 च्या कलम 11 अन्वये कारवाई होऊ शकते.
मुख्याधिकारी तथा चार्ज ऑफिसर यांनी स्पष्ट केले की, दिलेल्या मुदतीत समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास संबंधितांविरुद्ध पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. या कारवाईमुळे जनगणना प्रक्रियेत शिस्त आणि जबाबदारी वाढवण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
















