मंगळवेढा – बाळंतपणासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल असलेल्या पत्नीचा जेवणाचा डबा घेवून निघालेल्या 24 वर्षीय पतीला मंगळवेढा ते उमदी मार्गावरील हुलजंती हद्दीत एका ट्रक चालकाने मोटर सायकलला राँग साईडने येवून धडक दिल्याने त्या पतीचा जागीच मृत्यू झाला असून या प्रकरणी ट्रक चालक चंद्रशेखर बी.बाळूसामी (रा.तामिळनाडू) याच्या विरुध पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,दि.3 रोजी सायंकाळी 6.15 वाजता यातील मयत मनोहर सोमराया सुंठे (वय 24) हा मोटर सायकल क्रमांक के.ए.28 ई.व्ही.3590 वरुन मंगळवेढा ते उमदी मार्गावरुन सोड्डी फाट्याजवळ 1 कि.मी.अंतरावर हुलजंती हद्दीमध्ये पत्नी भाग्यश्री हिला जेवणाचा डबा दवाखान्यात घेवून जात असताना समोरील वाहनास ओव्हरटेक करत टी.एन.52 ए.ई.5882 वरील चालक तथा आरोपी चंद्रशेखर बी.बाळूसामी याने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवून राँग साईडला येवून मनोहर सुंठे याच्या मोटर साकलला कट मारुन जोराची धडक दिल्याने मोटर सायकलस्वार गंभीर जखमी होवून जागीच मयत पावला असल्याचे संजय सुंठे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान ट्रक चालक यांनी अपघाताची खबर न देता ट्रक घेवून फरार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान या अपघातानंतर हुलजंती गावातील ग्रामस्थांनी एकत्र येवून येथील चेकपोस्टला कुलूप घालून येथून जाणारी वाहतूक सेवा बंद केली.
फोटो ओळी
हुलजंती येथील अपघातानंतर ग्रामस्थांनी चेकपोस्ट बंद करुन येणारी जाणारी वाहतूक थांबवल्याचे छायाचित्रात दिसत आहे.























