सोलापूर – ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने मोहोळ तालुक्यातील खवणी येथे अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई करत तब्बल 19 लाख 62 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
धनराज अविनाश भोसले (रा. पोखरापूर, ता. मोहोळ), ज्ञानेश्वर धर्मा उन्हाळे (रा. पोखरापूर, ता. मोहोळ) व अमर मोहन गिड्डे (रा. मोडनिंब, ता. माढा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या विशेष मोहिमे दरम्यान 8 मे रोजी मोहोळ पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना खवणी येथील नागनाथ नर्सरीजवळ वरील तिघे आरोपी हे विनापरवाना दारूची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता वरील तिघे आरोपी हे एका वाहनातून दुसऱ्या वाहनात अवैध दारू उतरविताना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपींना ताब्यात घेऊन देशी दारू “टॅंगो पंच” कंपनीचे 90 मिलीचे 77 बॉक्स, बोलेरो कॅम्पर, स्विफ्ट कार तसेच दोन मोटारसायकली असा एकूण 19 लाख 62 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक अमित बाबर, पो. कॉ. हरिदास थोरात, घाडगे, दोरकर, शिंपाळे व चालक पवार यांनी पार पाडली.






















