सोलापूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवार, दि. ९ मे रोजी वर्षातील दुसरी ‘राष्ट्रीय लोकअदालत’ घेण्यात आली. या लोकअदालतीत एकूण ६५,०५७ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील ३५,८२० प्रलंबित आणि २९,२३७ दाखलपूर्व ठेवण्यात आली होती. त्यापैकी ४,३९२ प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली.
येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयांमध्ये या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात एकूण ५५ कोटी ५२ लाख ८० हजार ८०६ रुपये रक्कमेची तडजोड करण्यात आली. यात २ वैवाहिक प्रकरणात तडजोड झाली. तालुका निहाय कामगिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मोठ्या संख्येने प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात बार्शी तालुक्यात सर्वाधिक २,४५७ प्रकरणे निकाली निघाली, तर सोलापुरात ६३२ प्रकरणांत तब्बल ३९.८३ कोटींची तडजोड झाली. विशेष मोहिमेसाठी लोकअदालतीच्या दि. ४ मे ते ८ मे दरम्यान जिल्ह्यात ‘विशेष मोहिम’ राबवण्यात आली होती.
लोकअदालतीत विविध बँका, बीएसएनएल, महावितरण, शहर वाहतूक शाखा आणि विविध पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुनील शिंदे यांच्यासह सर्व पॅनेल विधीज्ञ, लोकअभिरक्षक आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
रोड एक्सीडेंट मध्ये मयत झालेल्या एका व्यक्तीच्या वारसांना जिल्हा न्यायाधीश व्ही. एस. मलकलपट्टे-रेड्डी व पॅनेलने विमा कंपनीसोबत यशस्वी तडजोड घडवून प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या हस्ते या कुटुंबाला नुकसान भरपाई म्हणून १९ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

























