सोलापूर – खात्रीशीर मिळालेल्या माहितीवरून ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने माचनूर (मंगळवेढा ) येथे एका दुचाकी स्वारास अटक करून सव्वा लाख रुपये किमतीचा 4 किलो गांजा जप्त केला आहे .
शाहू आली धावड ( रा . ब्रह्मपुरी तालुका मंगळवेढा ) असे त्या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे .
पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.या दरम्यान पोलीस पथकातील पो. कॉ. राहुल देवकर यांना वरील आरोपी हा 9 मे रोजी माचनूर येथील उड्डाणपुलाचे बाजूस अमली पदार्थ गांजा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्या प्रमाणे पोलिसांनी माचनूर येथील उड्डाणपुलाचे बाजूस सर्विस रोडवर सापळा लावला असता वरील आरोपी हा मोटरसायकल आला तेव्हा पोलिसांनी त्याला पकडले . माहितीप्रमाणे त्याच्या जवळील सॅक मध्ये गांजा आढळून आला. पोलिसांनी 4 किलो 128 ग्रॅम गांजासह मोटरसायकल, मोबाईल व सॅक असा एकूण 1 लाख 27 हजार 660 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सदरची कामगिरी ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप ,सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर व पोलीस अंमलदार नीलकंठ जाधवर, सलीम बागवान, विरेश कलशेट्टी, जयवंत सादुल, राहुल दोरकर, हरीश थोरात, अन्वर आतार, सुनील पवार,बाळराजे घाडगे,राजेंद्र गवेकर यांनी पार पाडली आहे .























