बदलापूर : प्रतिष्ठेच्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी बदलापूर शहर सज्ज झाले असून १३ ते १७ मे २०२६ कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी राज्यतील ८ विभागातील ३८४ खेळाडूंचा थरार रंगणार आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन व कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १३ मे रोजी सायं. ६ वाजता हेंद्रेपाडामधील बदलापूर जिमखाना मैदानावर होईल. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार , कुळगाव-बदलापूर नगरपरिषदच्या नगराध्यक्षा श्रीमती रूचिता घोरपडे, क्रीडा सचिव रणजीतसिंह देओल, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, क्रीडा आयुक्त श्रीमती शीतल तेली -उगले आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
तब्बल २ वर्षांनंतर होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी राज्यभरातील खेळाडूंचे आगमन बदलापूर नगरीत झाले आहे. ८ विभागातील ३८४ खेळाडू, ३२ मार्गदर्शक, ३२ व्यवस्थापक, एकूण ४४८ जणांचे पथक स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे. स्पर्धेत कोल्हापूर, लातूर, अमरावती, संभाजीनगर, पुणे, नागपूर, मुंबई व नाशिक या संघात चुरशीच्या लढती रंगणार आहे. १८ व २१ वर्षांखालील युवकांचा व्हॉलीबॉलचा थरार प्रथमच बदलापूरमध्ये पहाण्यास मिळणार आहे.
मंगळवरी स्पर्धा आढावा बैठकीनंतर कुळगाव-बदलापूर नगरपरिषदच्या नगराध्यक्षा श्रीमती रूचिता घोरपडे यांनी मैदानाची पाहणी केली. यावेळी मुख्याधिकारी मारूती गायकवाड, नगरसेवक किरण भोईर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव निलेश जगताप व ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन पदाधिकारी उपस्थित होते.
पहिली छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा १५ ते २१ मे २०११ दरम्यान पुण्यातील बालेवाडी येथे पार पडली. गत दोन वर्षांपूर्वी बुलढाणा येथे स्पर्धा झाली. आता तब्बल २ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर बदलापूर नगरीत व्हॉलीबॉलचा उत्सव रंगणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना २३ लाख ३५ हजारांची रोख बक्षिसे व करंडक, पदके देणार येणार आहे. साखळी स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील विजयी व पराभूत संघ, उपांत्य फेरीतील प्रत्येक विजयी व पराभूत संघ, अंतिम फेरीतील विजयी संघ व अंतिम फेरीतील उपविजयी संघाला रोख बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती उपसंचालक नवनाथ फरताडे यांनी दिली आहे.
चौकट
*भव्य उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्रांच्या परंपरेचे दर्शन*
संध्याकाळच्या सत्रात ४ मैदानात रंगणाऱ्या स्पर्धेतील अडीच हजारपेक्षा अधिक क्षमतेची गॅलरी तयार करण्यात आली आहे. स्पर्धेचे भव्य उद्घाटन १३ मे रोजी सायं. ६ वाजता होणार असून शाहिर नंदेश उमप यांच्या सांस्कृतिक मेजवानीसह जिम्नॉस्टिक्सची चित्तथरारक प्रात्यक्षिके उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहे.
—-
*फोटोओळ -*
बदलापूरमधील राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा मैदानाची पाहणी करताना कुळगाव-बदलापूर नगरपरिषदच्या नगराध्यक्षा श्रीमती रूचिता घोरपडे, मुख्याधिकारी मारूती गायकवाड, नगरसेवक किरण भोईर व जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के.


























