सोलापूर : जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून आश्विनी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, आसरा चौक, सोलापूर येथे विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. परिचारिका व्यवसायातील सेवाभाव, समर्पण आणि मानवतेप्रती असलेली बांधिलकी यांचा गौरव करण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.
यावेळी विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन, प्रश्नमंजूषा तसेच विविध ज्ञानवर्धक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव संस्थेचे प्राचार्य राजू नराळे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सहभागाचे आणि सर्जनशीलतेचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
तसेच परिचारिका क्षेत्रातील सेवाभाव, रुग्णांप्रती असलेली निष्ठा आणि आरोग्य व्यवस्थेमध्ये परिचारिकांचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम आनंदी व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.
या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.























