बार्शी – बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध व्यवसायां विरोधातील धडक मोहिमेअंतर्गत पोलिसांनी मोठी कारवाई करत लातूर रोडवरील “लवंगी मिरची” कला केंद्रावर मध्यरात्री छापा टाकून तब्बल ५० लाख १३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या आदेशानुसार बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधात प्रभावी पेट्रोलिंग, नाकाबंदी व विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने रविवार दि. २४ मे २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १.३० वाजण्याच्या दरम्यान बार्शी-लातूर रोडवरील “लवंगी मिरची” कला केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या वेळेनंतरही सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तत्काळ संबंधित ठिकाणी धाड टाकली असता, कला केंद्र सुरु असल्याचे आढळून आले. यावेळी तेथे नृत्य करणाऱ्या महिला, ग्राहक, चालक व मालक अशा एकूण ७२ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई दरम्यान पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल फोन, विविध साहित्य, चारचाकी व दुचाकी वाहने तसेच देशी दारुच्या बाटल्या असा एकूण ५० लाख १३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास बार्शी तालुका पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे तसेच सहायक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव, पोसई चंद्रकांत घोळवे, पोहेकॉ धनराज केकाण, पोहेकॉ डुकळे, पोहेकॉ स्वाती काटे, पोकों राहुल बोंदर, पोकों बिरकले, पोकॉ कांबळे, पोना चौधरी तसेच चालक पोकों खराडे महिला यांच्या पथकाने पार पाडली.
बार्शी तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांनी नुकताच नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर रविवारी त्यांनी सांगितले की, तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसायांवर यापुढे धडक कारवाया करण्यात येणार आहेत. हद्दीत चोरून असलेले अवैध दारू विक्री, मटका, गुटखा, पत्त्यांचा जुगार क्लब, लॉजेस वरील वेश्याव्यवसाय, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर तडीपार कारवाई करण्यात येणार आहे.
Post Views: 17