बार्शी – तालुक्यात शनिवार दि. २३ मे रोजी रात्री विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाने मोठा तडाखा दिला. या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याच्या घटना घडल्या असून, पिंपळगांव (धस) येथे वीज पडून शेतकऱ्याची दुभती म्हैस जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर धामणगांव दुमाला येथे जोरदार वाऱ्यामुळे जुने पिंपळाचे झाड पत्र्याच्या शेडवर कोसळून नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शनिवारी रात्री बार्शी शहरासह पिंपळगाव (धस), आगळगांव, उंबर्गे, काटेगाव परीसरात तसेच वैराग परिसरातील अनेक गावांना वादळी वारे आणि जोरदार पावसाचा फटका बसला. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला असून, शेती व घरांच्या नुकसानीच्या घटना समोर येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव (धस) येथील शेतकरी संदीप परमेश्वर पाटील यांनी आपली दुभती म्हैस नेहमीप्रमाणे घराबाहेर बांधली होती. रात्री अचानक विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. याच दरम्यान म्हशीवर वीज कोसळल्याने ती जागीच मृत्युमुखी पडली. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
दुभती म्हैस मृत झाल्याने शेतकरी संदीप पाटील यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाने पंचनामा करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, धामणगांव दुमाला येथे रात्रीच्या वादळी वाऱ्यामुळे जुने मोठे पिंपळाचे झाड पत्र्याच्या शेडवर कोसळून नुकसान झाले. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनांची माहिती मिळताच तहसीलदार एफ. आर. शेख यांनी मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हवामान विभागाने पुढील काही दिवस वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिल्याने नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी व सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Post Views: 9